नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीच्या रिफायनरीवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. यामुळे रिफायनरींना मोठी आग लागल्याने जगाचा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 10 डॉलरनी वाढण्याची शक्यता आहे.
अरामको सरकारी कंपनीच्या दोन मोठ्या तेल रिफायनरींना शनिवारी रात्री लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यांमुळे तेल जगताला मोठा हादरा बसला आहे. तिकडे अमेरिकेने इराणला या हल्ल्यासाठी दोषी धरले आहे. यामुळे तेलाच्या किंमती प्रती बॅरल 10 डॉलर म्हणजेच 710 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
ड्रोन हल्ल्यांमुळे सौदी अरबचे तेल उत्पादन प्रती दिन 57 लाख बॅरल किंवा 50 टक्के घट झाली आहे. यामुळे कंपनी बंद राहिल्यास याचा मोठा परिणाम होणार आहे. याबाबत अंदाजही लावता येणार नाही. यामुळे तेल क्षेत्रात अनिश्चितता असून याचा परिणाम किंमतींवर होणार आहे.
लिपो आईल असोसिएट्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिपो यांनी सांगितले की, ही एक मोठी घटना आहे. जेव्हा बाजार सुरू होईल तेव्हा क्रूड तेलाचे दर पाच ते 10 डॉलर वाढणार आहेत. तर क्लिअरव्ह्यू एनर्जीचे प्रमुख केविन बुक यांनी सांगितले की, कंपनीच्या प्लांटची दुरुस्तीसाठी लागणारा वेळ किंमतीवर प्रभाव पाडणार आहे. काही आठवडे किंवा महिन्याचा वेळही लागू शकतो. जर पुरवठ्यामध्ये झालेली घट तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहिली तर तेलाच्या किंमती 10 डॉलरनी वाढतील.
शुक्रवारी डब्ल्यूटीआय क्रूड 55 डॉलर आणि ब्रेंट क्रूड 60.25 डॉलर प्रतीबॅरलवर बंद झाले होते. दुसरीकडे सौदीच्या अरामको कंपनीने अध्यक्ष आमीन नासिर यांनी सांगितले की, उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पुढील 48 तासांमध्ये यातील प्रगतीची माहिती दिली जाईल.