नवी दिल्ली - इंधन महाग होण्याचं संकट केवळ भारतातच नाही, तर शेजारील देशांनाही याचा फटका बसत आहे. भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंका देशातही पेट्रोलचे भाव चांगलेच कडाडले आहेत. येथे पेट्रोल 177 रुपये प्रति लीटर व डिझेल 121 रुपये प्रति लिटर रुपयांनी विकले जात आहे. विशेष म्हणजे येथील सरकारकडे आयत करण्यात आलेल्या वस्तूंची रक्कम देण्यासाठी विदेशी चलनही उपलब्ध नाही. त्यामुळे, श्रीलंकेनं भारताकडे मदत मागितली आहे.
श्रीलंकेतील सार्वजनिक तेल कंपनी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या स्थानिक सहायक संस्थांनी देशातील विदेशी चलनाच्या तुटवड्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. तसेच, भारत आणि ओमान देशाकडून इंधन खरेदीसाठी कर्जपुरवठ्याची मदत करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचंही श्रीलंकन सरकारने म्हटलं आहे. सीपीसी (सरकारी सिलॉन कंपनी) ने सरकारकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली होती. दरम्यान, सरकारने ऑक्टोबर महिन्यानंतर आता पुन्हा इंधन दरवाढ करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, नुकतेच सीपीसीने पेट्रोलच्या किंमतीत 20 आणि डिझेलच्या किंमतीत 10 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच, श्रीलंकेत पेट्रोल 177 व डिझेल 121 रुपये लिटरवर पोहोचले आहे.
श्रीलंकेला सद्यस्थिती विदेशी चलनाचा तुटवटा मोठ्या प्रमाणात जाणवत असून देशासमोर तेच संकट गंभीर बनलं आहे. देशातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची सहायक कंपनी लंका आयओसी (LIOC) चं पेट्रोल 95 ऑक्टेन सीपीसीपेक्षा तीन रुपये जास्त महाग आहे. श्रीलंकेत विदेशी चलनाचा एवढा तुटवडा आहे, की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील केवळ 1 महिनेच आयात करता येईल, एवढे विदेशी चलन उपलब्ध होते. त्यामुळेच, नोव्हेंबर महिन्यात सरकारने रिफायनरी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर, पेट्रोलियम उत्पादनांची आयात करण्याचा मार्ग स्विकारला आहे.