इस्लामाबाद: गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. पुढील काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी पार करतील. डिझेलच्या दरातही वाढ होत असल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हं आहेत. शेजारच्या पाकिस्तानातही भारतासारखीच परिस्थिती आहे. महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढपाकिस्तानात पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. मात्र आता हे दर लवकरच सव्वाशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तेल आणि वायू नियामक प्राधिकरणानं (ओग्रा) इम्रान खान सरकारला पेट्रोलच्या दरात लिटरमागे १६ रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानात पेट्रोलचा दर १११.९० रुपये आहे. यामध्ये आणखी १६ रुपयांची भर पडल्यास पेट्रोलचा दर १३० पाकिस्तानी रुपयांच्या जवळ जाईल. पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारणजागतिक बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारनं इंधनाच्या दरांत वाढ करावी असा सल्ला ओग्रानं इम्रान खान यांना दिला आहे. सरकारनं पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ न केल्यास इंधन कंपन्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागेल, अशा धोक्याचा इशारा ओग्रानं दिला आहे. त्यामुळे आता खान सरकारला इंधन दरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल.ओग्रानं इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शिफारस करूनही पेट्रोल, डिझेलच्या नाममात्र वाढ केल्याचं काही दिवसांपूर्वी खान सरकारनं म्हटलं होतं. मात्र आता ओग्रानं पुन्हा इंधनाचे दर वाढवण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे आता खान सरकारवर मोठा दबाव आहे. १६ फेब्रुवारीपासून पाकिस्तानात इंधनाचे दर वाढतील. पण ही वाढ ३ रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती पाकिस्तान सरकारमधील अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
पाकिस्तानातही पेट्रोलचे दर पेटणार; 'ओग्रा'च्या सल्लानं इम्रान खान सरकार गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 3:52 PM