जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. असं असतानाच आता एक घटना समोर आली आहे. लस निर्मात्यांनाच कोरोनाने गाठलं आहे. कोरोना लस बनवणारी कंपनी Pfizer च्या सीईओंनाच चार डोस घेऊन देखील कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला (Pfizer CEO Albert Bourla) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दिली. तसेच त्यांना सौम्य लक्षणं आहेत, असंही सांगितलं. बोर्ला यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केलंय. त्यात म्हटलं आहे की, "मला जनतेला सांगायचं आहे की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आयसोलेशनमध्ये आहे आणि खबरदारी घेण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलत आहे."
"मी आभारी आहे की मी फायझर बायोटेक लसीचे चार डोस घेतले आहेत आणि आता मला कोरोनाचा संसर्ग होऊनही लक्षणं कमी आहेत, त्यामुळे मला बरं वाटतंय. मी Paxlovid घेणं सुरू केलं आहे." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.