गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या महासाथीला सुरूवात झाली होती. वर्ष उलटल्यानंतरही अनेक देशांमध्ये कोरोनाची महासाथ सुरू आहे. सध्या अनेक देशांनी आपली लस विकसित केली असून लसीकरणाचे कार्यक्रमही हाती घेण्यात आले आहेत. परंतु लहान मुलांना ही लस देता येणार नाही. दरम्यान, सध्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. अमेरिकेची फार्मा कंपनी Pfizer आणि कंपनीची सहयोगी जर्मन कंपनी बायोएनटेक एसईनं (BioNTech SE) लहान मुलासांठी विकसित करण्यात येत असलेल्या लसीची चाचणी सुरू केली आहे. दरम्यान ही लस २०२२ या वर्षाच्या सुरूवातीला बाजारात दाखल होईल असा विश्वासही कंपनीनं व्यक्त केला. बुधावरी वॉलेंटिअर्सच्या पहिल्या बॅचला सुरुवातीच्या चाचणीअंतर्गत लसीचा पहिला डोस दिला असल्याची माहिती फायझरच्या प्रवक्त्या शॅरन कॅस्टिलो यांनी दिली.
फायझर आणि बायोएनटेकला १६ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणीसाठी अमेरिकेतील नियामक मंडळानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंजुरी दिली होती. याशिवाय मॉडर्ना इंकनंदेखील (Moderna Inc) गेल्या आठवड्यात लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यांना सुरूवात केली आहे. यामध्ये सहा महिन्यांपासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. अशाचप्रकारची चाचणी आता फायझरनंही सुरू केली आहे.फायझर-बायोएनटेक १६ वर्षाच्या मुलांना लस देणारी पहिली कंपनीफायझर-बायोएनटेक ही अमेरिकेत एकमेव अशी कंपनी आहे ज्यांची कोरोना प्रतिबंधात्मक लस १६ आणि १७ वर्षांच्या मुलांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मोडर्नाची लस १८ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीच्या लसीचा वापर लहान मुलांवर करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. फायझर-बायोएनटेकच्या या लसीची चाचणी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये १४४ मुलांना सहभागी करून घेतलं जाणार असून त्यांना १०, २० आणि ३० मायक्रोग्रॅममध्ये दोन डोस देत सुरूवातीच्या टप्प्यातील चाचणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चाचणीच्या अंतिम टप्प्यात यातील स्वयंसेवकांची संख्या वाढवून साडेचार हजार करण्यात येणार आहे. २०२१ या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये या चाचण्यांचा अहवाल समोर येण्याची शक्यता आहे.