कोरोनाची लस तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेली फायजर (Pfizer) आणि बायोएनटेकची (BioNTech) कोरोना लस लहान मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीनं केला आहे. वय वर्ष १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी 'फायजर'ची लस १०० टक्के प्रभावी ठरली असून यात लस घेतल्यानंतर कोणतेही 'साइड इफेक्ट' देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. (Pfizer Vaccine 100 Percent Effective To Children Ages 12 to 15)
पालकांनो सावधान! कोरोना नवीन स्ट्रेन लहान मुलांनाही संक्रमित करणार; संशोधकांचा दावा
अमेरिकेत एकूण २ हजार २५० लहान मुलांवर फायजरच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी केली गेली. यात लस दिल्यानंतर ती १०० टक्के प्रभावी ठरल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. लशीचा दुसरा डोस दिल्याच्या एक महिन्यानंतर मुलांमध्ये कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडिज तयार झाल्याचं निदर्शनास आलं आहे. लशीला तात्काळ मंजुरी मिळण्यासाठी लवकरच यासंदर्भातील संपूर्ण डेटा अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनला पाठविण्याचा विचार फायजरनं केला आहे.
भारतीय वंशाचा अभिनव देखील चाचणीत सहभागीफायजरच्या लशीची चाचणी ऑक्टोबर २०२० पासून सुरु करण्यात आली. याचे परिणाम आता समोर येत आहेत. भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिनव यानंही फायजर लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. अभिनव याचे वडील डॉक्टर असून तेही या लशीच्या चाचणीत सहभागी झाले होते. अभिनव यानं अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पीटलमध्ये फायजर लशीचा डोस घेतला होता.
२ ते ५ वर्षांच्या मुलांवरही चाचणीची योजनाफायजर कंपनीनं गेल्या आठवड्यात ६ महिने ते ११ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांमध्ये लशीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान वयोगट ५ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस टोचण्यात आली. कंपनी आता पुढील आठवड्यापासून वयवर्ष २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस टोचण्यास सुरुवात करणार आहे. या चाचणीत ४ हजार ६४४ लहान मुलं सामील होणार आहेत. चाचणीचे निकाल २०२१ च्या शेवटपर्यंत हाती येतील असा अंदाज आहे.
फायजरसोबतच अमेरिकेची मॉर्डना ही आणखी एक कंपनी कोरोना लशीची लहान मुलांवरील चाचणी करत आहे. यात १२ ते १७ वर्ष आणि ६ महिने ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश असणार आहे.
कोरोनाच्या म्युटेशनचा लहान मुलांना धोकाशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना दिवसेंदिवस रुप बदलत असल्यानं याचा धोका यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. यापुढील काळात कोरोना व्हायरसचे म्युटेशन गंभीर स्वरुपाचे तयार होऊ शकतात आणि याचा लहान मुलांना खूप धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाची लागण होणाऱ्यांमध्ये लहान मुलांचं प्रमाण कमी असलं तर भविष्यातील म्युटेशनचा धोका लक्षात घेता लहान मुलांनाही जास्तीत जास्त संख्येनं लस देण्याची गरज असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.