ब्रिटनमध्ये फायझर कंपनीच्या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले असल्याच्या दुसऱ्याच दिवशी या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला अमेरिकेच्या समितीने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे आता अमेरिकी सरकारही या लसीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची शक्यता आहे. समितीने सांगितले की, ही लसीचे गुण कोरोनाचे धोके कमी करतात.
फायझरला पहिल्यांदा ब्रिटनने परवानगी दिली होती. यानंतर बहारीन दुसरा देश ठरला होता. त्याआधीच फायझरने अमेरिकेकडेही परवानगी मागितली होती. याच कंपनीने भारताकडेही इमरजन्सी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. आता अमेरिकेनेही हिरवा कंदील दाखविल्याने फायझरला मोठे यश मिळाले आहे. फायझरने ही लस जर्मनीच्या बायोएनटेक सोबत विकसित केली आहे.
गुरुवारी अमेरिकेत आठ तास जनसुनावणी झाली. यानंतर एफडीएची लस आणि जैविक उत्पादने सल्लागार समिती (व्हीआरबीपीएसी) ने फायझरच्या लसीच्या लसीकरणाचा प्रस्ताव पास केला. व्हीआरबीपीएसीचे सदस्य आणि फिलाडेल्फीयातील बालरोगतज्ज्ञ पॉल ऑफिट यांनी सांगितले की, फायझरच्या लसीचा एक स्पष्ट फायदा आहे, दुसरीकडे आमच्यासमोर सैद्धांतिक जोखीम आहे. हे लाभ कोरोनाचे संभावित धोके कमी करतात. आणखी एक सदस्य बालरोगतज्ज्ञ ओफर लेवी यांनी सांगितले की, हा एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. ब्रिटन आणि बहारीन या दोन देशांनी लसीकरणाला परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एफडीएने फायझरची लस चाचण्यांमध्ये आणि अमेरिकेच्या नियमावलीमध्ये यशस्वी ठरल्याचे म्हटले होते.
फाय़झरचा लसीबाबतचा डेटा चोरण्याचा प्रयत्नफायझर आणि बायोएनटेकने ब्रिटनमध्ये ज्या सरकारी संस्थेला कोरोना लसीसाठी मंजुरी अर्ज पाठविण्यात आला होता, तिथे सायबर हल्ला झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संस्थेतून हॅकर्सनी कोरोना लसीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या खासगी डेटापर्यंच कोणी पोहोचले असल्याचे आढळले नाहीय. सायबर हल्ल्याची समिक्षा करण्यासाठी अधिक वेळ लागणार नसल्याचे युरोपीय मेडिसिन एजन्सीने आश्वासन दिले आहे, असे कंपनीने सांगितले.
अॅलर्जी ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्यात येत आहे. लस टोचल्यानंतर अनेकांना अॅलर्जी देखील झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे संशोधकांची काळजी वाढली आहे. दोन्ही पीडित आरोग्य कर्मचारी Anaphylactoid Reactions चे शिकार झाले आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या रेग्युलेटरी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला ज्यांना कुठलेही औषध, अन्न आणि लसीची अॅलर्जी आहे, अशांना फायझरची लस देण्यात येऊ नये, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. भारतातही आपत्कालीन लसीकरणासाठी फायझरने पहिलाच अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सिरमने आणि त्यानंतर भारत बायोटेकने अर्ज केला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनकडून कोरोनाच्या आठ लाख डोसचा वापर करण्यात येणार आहे. मात्र ख्रिसमसपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या लसीचे लाखो डोस उपलब्ध होतील, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.