लंडन : ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक आॅफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. ९५ वर्षांचे फिलिप येत्या आॅगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत, असे बकिंगहॅम राजप्रासादाने जाहीर केले.राजे फिलिप सुमारे ७८० विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत. ड्यूक आॅफ एडिन्बर्ग यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयाला महाराणी एलिझाबेथ यांचा पाठिंबा आहे. ड्यूक राणीसोबत किंवा स्वतंत्रपणे आॅगस्टपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होत राहतील. त्यानंतर ते दौरे आणि भेटीगाठींचे कोणतेही नवे निमंत्रण स्वीकारणार नाहीत. तथापि, ते वेळोवेळी काही खास कार्यक्रमांत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात.प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले आहेत. यात भारताच्या तीन दौऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी १९६१ मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर १९८३ आणि १९९७ मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते. आजच्या घोषणेनंतर आपण ड्यूक आॅफ एडिन्बर्ग यांचे देशांच्या वतीने आभार मानू इच्छिते तसेच त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते, असे ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी म्हटले आहे.
शाही जबाबदारीतून फिलिप यांची निवृत्ती
By admin | Published: May 05, 2017 1:27 AM