मनिला : दक्षिण फिलिपाईन्सला उष्णकटिबंधीय वादळाचा तडाखा बसला असून, यात २०० ठार झाले आहेत. वादळाने अनेक ठिकाणी महापूर आले व भूस्खलन होऊन शहरे उद्ध्वस्त झाल्याने हजारो लोक विस्थापित झाले आहेत.देशातील दुसरे मोठे द्वीप मिंदानाओमध्ये टेंबिन वादळ १२५ किलोमीटर प्रति तास वेगाने धडकले व या बरोबरच मुसळधार पाऊसही दाखल झाला. यात पर्वतीय भागातील एक गाव वाहून गेले. यात १४४ पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून, ४० हजारांपेक्षा जास्त लोकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. वादळग्रस्तांना मदत करणाºया एका आंतरराष्टÑीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वादळाने किमान ७० हजार लोकांना बेघर केले. तुफान पाऊस सुरू असल्याने मदतकार्य प्रभावित होऊ शकते. वादळ, मुसळधार पाऊस व पुरापासून जीव वाचविण्यासाठी लोक जीव मुठीत धरून पळत आहेत.फिलिपाईन्सला दरवर्षी मोठ्या वादळांचा सामना करावा लागतो, परंतु दोन कोटी लोकसंख्या असलेला मिंदानाओ या वादळामुळे क्वचितच प्रभावित होतो. फुटेजमध्ये दिसल्यानुसार, हे द्वीप पाण्याखाली गेले असून, लोकांनी सुरक्षित जागी आश्रय घेतलेला आहे. (वृत्तसंस्था)
फिलिपाईन्सला वादळाचा तडाखा, 200 ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:04 AM