Philippines Plane Crash : फिलिपिन्समध्ये एका लष्कराच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानात जवळपास 85 जण प्रवास करत होते. दक्षिण फिलिपिन्समध्ये लँडिंग करत असताना या लष्कराच्या विमानाला अपघात झाला. याबाबतची माहिती फिलिपिन्सच्या लष्कर प्रमुखांनी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 17 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
सी-130 विमान सुलू प्रांतातील (Sulu province) जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर या विमानाला आग लागली. या विमान अपघातातून आत्तापर्यंत 40 जणांना वाचविण्यात यश आले आहे, असे लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी सांगितले.
याचबरोबर, हे विमान दक्षिणेकडील कागायन डी ओरो शहरातील सैनिक घेऊन जात होते. परंतु धावपट्टी चुकल्याने विमानाचा अपघात झाला. सुलु प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना या विमानाला आग लागली आणि अपघात झाला, असे लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना म्हणाले.
दरम्यान, मुस्लीम बहुल प्रांतातील सुलूमधील सरकारी लष्कराने अनेक दशकांपासून अबू सय्यफच्या अतिरेकी लोकांशी झुंज दिली आहे.