फिलीपिन्सला 'राय' चक्रीवादळाचा (Philippines Super Typhoon Rai) तडाखा बसला आहे. या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने फिलीपिन्सचं खूप मोठं नुकसान केलं आहे. यामध्ये आतापर्यंत 208 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 239 लोक जखमी झाले असून 52 बेपत्ता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ 'राय'ने द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भाग उद्ध्वस्त केला आहे. गुरुवारी वादळाचा तडाखा बसल्यानंतर तीन लाखांहून अधिक लोकांना आपलं घरं सोडावं लागलं आहे. समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स रिकामी करण्यात आले आहेत. फिलीपिन्स रेड क्रॉसने किनारी भाग पूर्णपणे ओसाड झाला आहे असं म्हटलं आहे.
रेड क्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरे, रुग्णालये, शाळा आणि रहिवाशी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे घरांचे छप्पर तुटले आहे, झाडे उन्मळून पडली आहेत. काँक्रीटचे विजेचे खांब कोसळले, लाकडी घरे तुटली आणि गावांमध्ये पूर आला. राय चक्रीवादळाची तुलना 2013 मधील हैयान चक्रीवादळाशी केली जात आहे. फिलीपिन्समधील योलांडा नावाचे हैयान हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक वादळ मानले जाते. ज्यामध्ये 7,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण बेपत्ता झाले होते.
बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश
प्रांतीय गव्हर्नर आर्थर याप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितलं की, यावेळी सर्वाधिक प्रभावित बेटांपैकी एक म्हणजे बोहोल. जो समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. येथे किमान 74 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिरगाव, दिनागट आणि मिंडानाओ या बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. वादळामुळे ताशी 195 किलोमीटर वेगानं वाऱ्याचा वेग आला. प्रांतीय माहिती अधिकारी जेफ्री क्रिसोस्टोमो यांनी रविवारी एएफपीला सांगितलं की, दिनागट बेटांवर किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प
सिरगाओ बेटावरील जनरल लुना या लोकप्रिय पर्यटन शहरामध्येही परिस्थिती वाईट आहे. ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात, मात्र आता तिथे अन्नपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. अनेक भागात दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वादळामुळे झालेल्या एकूण नुकसानीचा अंदाज घेणे आपत्ती यंत्रणांना कठीण जात आहे. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. घरातील वीज गेली आहे. शोध आणि बचावासाठी हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारी तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे रवाना करण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.