कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी जग आतुरले आहे. त्यामुळेच लसींच्या निर्मितीला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विकसित देशांनी पैशाच्या थैल्या त्यासाठी मोकळ्या सोडल्या आहेत. एकीकडे लसींच्या निर्मितीला वेग दिला जात असतानाच जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने आता कोरोनावर मात करू शकतील अशा अँटिव्हायरल गोळ्या आणण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे.
वर्षअखेरपर्यंत पिल्स येण्याची शक्यता
कोरोनाप्रतिबंधक लसी आणि औषधांसाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. अमेरिका त्यात सर्वात पुढे आहे. निधी पुरवठ्यातही अमेरिका अग्रेसर आहे. अमेरिकेने कोरोनावरील अँटिव्हायरल गोळ्या तयार करण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या गोळ्या तयार करण्यात अमेरिकेला यश आले तर कोरोनावरील उपचार सोपे होतील. गेल्या वर्षी अमेरिकेने कोरोनावरील लसीच्या निर्मितीसाठी १८ अब्ज डॉलर खर्च केला होता.
कोरोना विषाणूवर अद्याप औषध नाही
कोरोना विषाणूवर प्रभावी ठरेल, असे औषध अद्याप बाजारात आलेले नाही. आतापर्यंत फक्त लसी आल्या आहेत. त्यांचा प्रभाव कधीपर्यंत राहील, हे अद्याप स्पष्ट नाही. अमेरिकेने कोरोनाविरोधातील अँटिव्हायरल पिल्स तयार करण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे.
काय वैशिष्ट्य असेल पिल्सचे?
कोरोनावर प्रभावी ठरणारे जगातले पहिले औषध. कोरोनामुळे प्रकृती गंभीर होण्याच्या आधीच या गोळ्या कोरोनाचा संसर्ग निष्क्रिय करेल. अमेरिकेचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोरोनावर उपचार करणे सहजसोपे होईल.