नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आता मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. काहींनी परिस्थितीसमोर हार न मारता नवनवीन मार्ग शोधले आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये एका पायलटची नोकरी गेली पण हार न मानता लाखोंची कमाई केल्याची घटना समोर आली आहे.
कोरोना काळात विमान कंपन्यांनी देखील वाईट दिवस पाहिले. अनेक वैमानिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काही ठिकाणी पगार कपात करण्यात आली आहे. यूकेचे पायलट एरोन लेवेंथल (Aaron Leventhal) यांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला. नोकरी गमवावी लागल्यामुळे त्यांना लॉरी ड्रायव्हरचं (Lorry Driver) काम करावं लागत आहे. पण त्यांनी खचून न जाता सर्वप्रथम ट्रक चालवण्यासाठी लायसन्स काढलं. फ्रीलान्स डायव्हर म्हणून काम करण्याचा मोठा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना सुपरमार्केटमध्ये अन्नपदार्थ आणि इंधन पुरवठा करण्यास सांगण्यात आलं.
'द सन'मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, फ्लायबे एअरलाइन्समध्ये काम करताना एरोन लेवेंथल या पायलटचा वार्षिक पगार 30,000 पाऊंड स्टर्लिंग म्हणजेच जवळपास 30 लाखांहून अधिक होता. तर सध्या फ्रीलान्स ट्रक चालकांना वार्षिक 40,000 पाऊंड मिळत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन क्षेत्राशी संबंधित कंपन्या चालकांना अधिक पगार आणि सुविधा देऊ करून नोकऱ्या देत आहेत. ज्यामुळे भविष्यात त्यांचे पगार आणि भत्तेही वाढू शकतात. यापूर्वी या लॉरी चालकांना एका तासाच्या कामासाठी नऊ पाऊंड मिळत असत पण आता त्यांना प्रति तास किमान 30 पाऊंड दिले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.