विमान प्रवासातील एक गंमतीशीर गोष्ट घडली आहे. सोमवारी अमेरिकेहून चीनला जाण्यासाठी एक प्रवासी विमान निघाले होते. सारे काही वेळेनुसार घडत होते, हवामान साफ होते. अचानक पायलटच्या लक्षात आले, तो पासपोर्टच घरी विसरलाय. मग काय त्याने दोन तासांचे अंतर कापले होते, तिथून त्याने विमान माघारी वळविले. या किस्स्यामुळे चीनच्या सोशल मीडियावर या विसरभोळ्या पायलटला यथेच्छ टीका सहन करावी लागली आहे, आता तो ही गोष्ट आयुष्यभर विसरू शकणार नाही.
परदेशात जाताना पासपोर्ट किंवा तिकीट घरीच विसरल्याची घटना अनेकदा लोकांसोबत घडलेली आहे. परंतू, वैमानिक पासपोर्ट विसरला आणि ते ही त्याच्या प्रवासात लक्षात आले व माघारी यावे लागल्याची घटना अत्यंत विरळ आहे.
युनायटेड एअरलाईंसचे बोईंग विमान ७८७ हे २२ मार्चला दुपारी दोन वाजता लॉस एँजेलिसहून निघाले होते. विमानात २५७ प्रवासी आणि १३ क्रू मेंबर होते. विमानाने उड्डाण करून दोन तास झाले होते. प्रशांत महासागराच्या वर हे विमान आले असता एका पायलटला आपण पासपोर्टच विसरल्याचे लक्षात आले.
त्याने उद्विग्न होत प्रतिक्रिया दिली, एअरलाईनला याची माहिती दिली आणि विमान माघारी वळविले. एअरलाईनने हे विमान लॉस एँजेलिसऐवजी सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यास सांगितले. या सगळ्या गोंधळात प्रवाशांचे सहा-सात तास वाया गेले. एअरलाईनने तिकडे तोवर नवीन पायलटची सोय केली होती, या विसरभोळ्या पायलटला तिथेच उतरवून पुन्हा उड्डाणाची परवानगी घेत विमान चीनकडे रवाना झाले. या काळात प्रवाशांना कंपनीने विमानतळावर जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटची कुपन्स दिली होती. एवढा वेळ आता विमानात जाणार म्हटल्यावर प्रवाशांना उपाशी थोडीच ठेवले जाणार होते. या एकट्या पायलटमुळे कंपनीचे आणि प्रवाशांचे करोडोंचे नुकसान झाले. काही प्रवाशांना चीनला पोहोचून दोन-तीन तास पुढे प्रवास करायचा होता. त्यांचेही प्लॅन फिस्कटले होते.