इथोपियामध्ये एक हैराण करणारी घटना घडली आहे. अदिस अबाबाला जाणाऱ्या विमानातील दोन पायलटना विमान उडवतानाच झोप लागल्याची घटना समोर आली आहे. विमान 37 हजार फूटावर असताना पायलट झोपले होते. यावेळी विमान ऑटो पायलट मोडवर उडत होतं. असं असताना विमानामध्ये अनेक प्रवासी होते. अदिस अबाबासाठी जाणारे विमान ET343 ठरलेल्या रनवेवर उतरलं नाही. तेव्हा एयर ट्रॅफिक कंट्रोलने कॉकपीटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही.
कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने काहीतरी गडबड झाल्याची शंका एयर ट्रॅफिक कंट्रोलला आली. द मिररच्या रिपोर्टनुसार, 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. ऑटो पायलट मोड डिस्कनेक्ट झाल्यावर प्लेनच्या आतमध्ये मोठमोठ्याने अलार्म वाजू लागला. त्याचवेळी एयर ट्रॅफिक कंट्रोल सुद्धा कॉकपीटशी संपर्क करू शकत नव्हतं.
ऑटो पायलटपासून संपर्क तुटल्यानंतर जोरात हॉर्न वाजू लागला आणि त्याच्या आवाजाने पायलटला जाग आली. त्यानंतर पायलटनी सुरक्षितरित्या विमान रनवेवर उतरवले. एविएशन एक्सपर्ट एलेक्स मॅक्रेस यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. लँडिंगच्या वेळी दोन्ही पायलट झोपेत असल्याचे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. ही बाब खूप चिंताजनक असून थकव्यामुळे पायलटला झोप लागली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.