बर्लिन : घरात भिंतीला असलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटमधून वीज घेऊन दोन आसनी व घराच्या बागेतही उतरविता येईल असे विमान जर्मनीमध्ये तयार होत आहे. नव्याने सुरू झालेली जर्मन कंपनी जगातील पहिलेच अति हलके व खासगी, उभ्या अवस्थेत उड्डाण करणारे, उतरणारे आणि पर्यावरणपूरक विमान बनवीत आहे. दोन जण बसतील असे हे पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान असून, त्याचे पंख हे नलिका आकाराचे असल्यामुळे ते खूपच साधे, आवाज न करणारे आणि पारंपरिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत सुरक्षित असे आहे. रोजच्या रोज वापरता येईल असे विमान बनविण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही असे विमान बनवीत आहोत की, ज्याला विमानतळावर गुंतागुंतीची आणि खर्चीक अशा पायाभूत सुविधांची गरज लागणार नाही, असे लिलुम या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल वेगॅन्ड म्हणाले. आवाज आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक इंजिन्स वापरणार आहोत व त्यांचा वापर खेड्यापासून शहरांपर्यंतही करता येईल, असे डॅनियल म्हणाले. या विमानाच्या निम्म्या आकाराच्या नमुन्याच्या उड्डाण चाचण्या सध्या घेण्यात येत आहेत. विमानाचा पूर्ण आकाराचा व चालकविरहित नमुना या उन्हाळ्यात तयार असेल, असे एझेडओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉरस्टेन रुडोल्फ यांनी सांगितले.।न्युनिक विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या चार जणांनी ही कंपनी स्थापन केली असून, डॅनियल त्यापैकी एक आहेत. विमानाचा आवाका 500किलोमीटरचा असेल व ते २०१८मध्ये विक्रीला उपलब्ध असेल. त्याचे नियंत्रण फ्लाय बाय वायरने व टचस्क्रीनवर फिचर्स असतील. साठवणुकीची क्षमताही जास्त असेल व त्याची बॅटरी घरातील इलेक्ट्रिक सॉकेटवरही चार्ज करता येईल.
घराच्या बागेतही उतरवता येणार विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 4:36 AM