अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये विमानतळाजवळ मोठा अपघात घडला आहे. विमानतळाजवळील शेतामध्ये एक लहान विमान कोसळलं. त्यानंतर त्या विमानाला आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात लॉस एंजिल्सपासून सुमारे १३० किमी दक्षिण पूर्वेला असलेल्या मुर्रिएटा येथे पहाटे ४.१५च्या सुमारास घडला. या दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत सुमारे एक एकर परिसरातील झाडे जळून खाक झाली.
या विमानामध्ये असलेल्या प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. रिव्हरसाइड कौंटीच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे एक तास लागला. अपघातानंतर या विमानाला आगीच्या ज्वाळांनी घेरले. या अपघातामुळे फ्रेंड व्हॅली विमानतळाजवळ काही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमेरिकेच्या फेडरल सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी बोर्डच्या टीमसह या अपघाताचा तपास करत आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार सेसना सी५५० हे विमान लास वेगास येथून कॅलिफोर्निया येथे जात होते. या विमानाने लास वेगासच्या हॅरी रीड इंटरनॅशनल एअरपोर्ट येथून सकाळी ३.१५ रोजी उड्डाण केले होते. त्यानंतर हे विमान कॅलिफोर्नियामधील मुरिएटा शहरात विमानतळाजवळ अपघातग्रस्त होऊन कोसळले.
नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी बोर्डाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैमानिक विमानत उतरवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अचानक तिथे धुके दाटून आले. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वैमानिकाला पाहण्यात अडचणी आल्या. त्याने याबाबत एटीसीला माहिती दिली. त्यानंतर एटीसीने त्याला विमान उतरवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करण्यास परवानगी दिली. मात्र धावपट्टीपासून अवघ्या ५०० फुटांवर असतानाच हे विमान कोसळले.