ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. १६ - इंडोनेशियन एअरलाईन्समागे लागलेले अपघातांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नसून रविवारी त्रिगान एअर सर्व्हिसचे विमान पापुआ प्रांताजवळ बेपत्ता झाले. पापुआतील घनदाट जंगलात या विमानाचे अवशेष आढळल्याचे वृत्त असून यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
इंडोनेशियातील पापुआ प्रांताची राजधानी जयापूरा येथून त्रिगान एअर सर्व्हिसचे विमान ऑक्सिबीलच्या दिशेने झेपावले होते. लँडिंग करण्याच्या नऊ मिनीटांपूर्वी विमानाचा संपर्क तुटला त्यावेळी विमान पापुआ प्रांतात होते. या विमानात ४९ प्रवासी व ५ कॅबिन क्रू मेम्बर्स असे एकूण ५४ जण होते. इंडोनेशियातील एअर लाईन्स उद्योग सध्या जोमात असला तरी अपघातांच्या मालिकांनी इंडोनेशियन एअरलाईन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. योग्य वैमानिक, मॅकेनिक, हवाई वाहतूक नियंत्रक अशा विविध तज्ज्ञांची कमतरता इंडोनेशियाला भासत आहे.