तेहरान- इराणमध्ये एक तुर्कीश प्रायव्हेट विमान क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत विमानात असणाऱ्या सर्व 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान संयुक्त अरब एमिरेट्सच्या शारजाह शहरातून इस्तांबूलला जात होतं. डोंगराळ प्रदेश व जोरदार पाऊस असल्याने विमानाचा अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त विमानाने शारजाह इंटरनॅशनल एअरपोर्टहून दुपारी उड्डाण केलं होतं. याच विमानाचा दक्षिण-पश्चिम भागात अपघात झाला.
इराणच्या एका वृत्तवाहिनीने आपत्ती व्यवस्थापन संघटनेचे प्रवक्ते मुज्तबा खालिदी यांच्या माहितीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं. बॉम्बार्डियर CL604 विमानाची शहर ए-कोर्डमध्ये एका डोंगरावर आदळलं ज्यामुळे आग लागली. दरम्यान, विमानात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचावपथक घटनास्थळी दाखल झालं असून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मृतांची डीएनए टेस्टच्या आधारे ओळख पटविली जाणार आहे.
दरम्यान, इराणमधील याच भागात एक आठवड्याआधीही अशीच एक विमान दुर्घटना घडली होती. त्या विमानात सहा प्रवासी होते. तेहरानहून यसुजला जात असताना या विमानाचा अपघात झाला होता.