मेक्सिको सिटी : ‘एअरोमोक्सिको’ कंपनीच्या देशांतर्गत उड्डाणावर असलेल्या एका विमानात साप निघाल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि त्यांनी ‘स्नेक्स इन ए प्लेन’ या २००६ मधील बॉलीवूडपटातील कथानकाचा थरार प्रत्यक्षात अनुभवला. सुदैवाने या घटनेत काहीही विपरित न घडता विमान सुखरूपपणे उतरले.उत्तरेकडील टॉरिआॅन शहरातून मेस्किको सिटीकडे येणाऱ्या विमानात ही घटना घडली. इंदालेशियो मेदिना या प्रवाशाने या घटनेची माहिती टिष्ट्वटरवर टाकली. ‘एअरोमेक्सिको’ कंपनीनेही त्यास दुजोरा दिला आणि मुळात साप विमानात आलाच कसा, याचा शोध घेण्यासोबत पुन्हा असे घडू नये, याचे उपाय योजण्यात येत असल्याचे नमूद केले. आसनांच्या वर सामान ठेवण्यासाठी असलेल्या कप्प्यांच्या फटीतून सुमारे तीन फूट लांबीचा व हिरव्या रंगाचा हा साप लटकताना एका प्रवाशाने पाहिला. त्याने विमान कर्मचाऱ्यास सांगितले. आसपासच्या आसनांवरील प्रवासी उठून बाजूला झाले व थोड्या वेळाने तो साप वळवळत खाली पडला. विमानात असलेले ब्लँकेट टाकून त्याची वाट अडवून ठेवण्यात आली.थोड्याच वेळात विमान मेक्सिको सिटीला पोहोचले आणि वैमानिकाने आणीबाणीचा संदेश पाठविल्याने त्यास तातडीने उतरण्यासाठी धावपट्टी मोकळी करून देण्यात आली. विमान सुखरूपपणे उतरताच घाबरलेले प्रवासी मागच्या बाजूने बाहेर पडले व प्राणिरक्षण विभागाचे कर्मचारी सापाला घेऊन जाण्यासाठी विमानात आले. (वृत्तसंस्था)
विमानात साप; प्रवाशांमध्ये घबराट
By admin | Published: November 09, 2016 6:19 AM