नवी दिल्ली - देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने काही शिथिलता दिल्याने विशेष रेल्वे, बससेवा सुरु करण्यात आली आहे. केवळ, विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची घरवापसी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदेशात फसलेल्या नागरिकांनाही मायदेशी आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायभूमीत आणण्यास सुरुवात केली आहे.
वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे. यापूर्वी गुरुवारी एअर इंडियाच्या दोन विमानातून ३६३ भारतीयांना मायदेशात आणण्यत आले आहे. एअर इंडियाच्या माहितीनुसार, आज विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन आज ५ विमाने भारतात येत आहेत. त्यामध्ये, सिंगापूर ते दिल्ली, रियाद, सौदी अरेबिया ते कोझीकोड, ढाका ते दिल्ली, बहरीन ते कोच्ची आणि युएई ते चेन्नई या ५ विमानांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत एअर इंडियाच्या दोन विमानांच्या उड्डाणाद्वारे ३६३ प्रवाशांना भारतात वापस आणण्यात आले आहे. या सर्वच प्रवाशांना केरळ सरकारने १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशातील १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायभूमीत आणण्यात येणार आहे. तर, अमेरिकेतून भारतात येण्याची प्रक्रिया ९ मे पासून सुरु होणार आहे. भारतात आल्यानंतर या सर्वच नागरिकांना क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे.