प्लॅस्टिकची समस्या पृथ्वीवर किती आवासून उभी ठाकली आहे, हे कोणाला वेगळे सांगायला नकोच. तुम्हाला मुळशी पॅटर्नमधील राहुल्या आठवतोय का, तोच पोलिसांनी ज्याला बकासुर म्हटलेले... पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकते.... मग मी प्लॅस्टिक आहे समजा...हा त्याचा डायल़ॉग लोकांच्या स्मरणात आजही आहे. ते आजवर खरेही आहे. कारण प्लॅस्टिकच्या विघटनाला हजारो वर्षे लागतात. पण आता एक मोठी खुशशबर आली आहे.
शास्त्रज्ञांनी एक एन्झाइम तयार केला आहे जो प्लॅस्टिकचे घटक एकमेकांपासून फार म्हणजे खुप वेगाने वेगळे करतो. जर्नल नेचरमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या एन्झाईम प्रकाराचा वापर प्लास्टिकच्या प्रदूषणाने दूषित झालेली ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकतो, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
पॉलिमर पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीईटी) पासून बनविलेले उत्पादन एका आठवड्यात एन्झाइमद्वारे तोडले गेले. काहीवेळा त्यासाठी २४ तास लागले. हे प्लॅस्टिक असे होते, ज्याच्या नैसर्गिक विघटनासाठी शेकडो वर्षे लागली असती. एन्झाइमला FAST-PETase असे नाव देण्यात आले आहे. नैसर्गिक PETase पासून एक एन्झाइम विकसित केले आहे ज्याचे जीवाणू PET प्लास्टिक नष्ट करतात.
महत्वाचे म्हणजे, जेव्हा एन्झाइम प्लास्टिक नष्ट करते, तेव्हा उरलेल्या पदार्थांवर पुन्हा प्रक्रिया करून पुन्हा प्लास्टिक बनवता येते. जगात पीईटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जागतिक कचऱ्यापैकी 12 टक्के या प्रकारच्या कचऱ्याचा वाटा आहे असे मानले जाते. जागतिक स्तरावर 10 टक्क्यांहून कमी प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. यामुळे हे एन्झाइम किती उपयोगी ठरू शकते, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.