लिमा : गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलावर येथे चाललेल्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रदीर्घ चर्चेनंतर अंतिम करार करण्यास यश मिळाले असून, सदस्य देशांनी कार्बन उत्सर्जनात कपात करण्याची शपथ घेतली आहे. हवामानाबाबत भारताने उपस्थित केलेल्या मुद्यामुळे पुढच्या वर्षी पॅरिस येथे होत असलेल्या हवामान परिषदेत सर्व देशांना बंधनकारक महत्त्वाकांक्षी करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेचे अध्यक्ष मॅन्युअल पुल्गार-विदाल यांनी करार झाल्याची घोषणा केली. ते पेरूचे पर्यावरणमंत्रीही आहेत. पेरूची राजधानी लिमा येथे गेले दोन आठवडे हवामान बदलावर जोरदार चर्चा सुरू होती.या चर्चेत १९४ देश सहभागी होते. भारताचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या संदर्भात बोलताना म्हणाले की, भारताच्या सर्व मुद्यांचा समावेश अंतिम करारात करण्यात आला आहे. २०१५ साली पॅरिस येथे होत असलेल्या परिषदेत मांडण्यासाठी विचारधारा या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. हे अधिवेशन निर्धारित कालावधीपेक्षा दोन दिवस अधिकच चालले. या परिषदेत तयार करण्यात आलेला पहिला मसुदा विकसनशील देशांनी फेटाळला होता. हा मसुदा मंजूर होणे ही पॅरिस येथे होणाऱ्या हवामान परिषदेची पूर्वतयारी आहे. हा करार हवामान बदलासाठी लिमाचे आवाहन या नावाने ओळखला जाणार आहे. २०१५ च्या डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे हवामान परिषद होईल, त्याआधी महिनाभर या ठरावाचा आढावा घेतला जाईल. परिषदेचे अध्यक्ष पुल्गार-विदाल यांनी काल दिवसभर विविध प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. त्यावरून तयार केलेला मसुदा वाटाघाटीत भाग घेणाऱ्या सदस्यांना हा मसुदा वाटण्यात आला व त्याचा अभ्यास करण्यासाठी एक तास देण्यात आला. कार्बन कपातीसाठी येणारा खर्च गरीब व श्रीमंत देशात कसा वाटला जावा या मुद्यामुळे या वाटाघाटी थोड्या अवघड झाल्या. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० वाजता मुख्य बैठक बोलावण्यात आली व त्यात विदाल यांनी मसुदा मंजूर झाल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
कार्बन उत्सर्जन कमी करण्याची घेतली शपथ
By admin | Published: December 15, 2014 2:52 AM