तेल अवीव:अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या २०१५ मधील अणू करार पुनर्रचित करण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात हा करार झाला होता. अमेरिकेने हा करार संपुष्टात आणला, तर इराण सर्व निर्बंधांमधून मुक्त होईल. या पार्श्वभूमीवर इराणपासून असलेला धोका टाळण्यासाठी गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. (pm benjamin netanyahu israel biggest threat remains the possibility of a nuclear armed iran us)
अण्वस्त्रधारी इराणकडून इस्रायला नेहमीच धोका असल्याचे नेतन्याहू यांनी यावेळी नमूद केले. तसेच अमेरिका आणि इराण यांच्या अणू करारावरून सुरू असलेल्या वाटाघाटीला इस्रायलचा विरोध असल्याचेही नेतन्याहू यावेळी बोलताना म्हणाले. इराणपासून इस्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. इराणच्या अणू क्षमतांचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेची नाराजी आम्ही पत्करू शकतो, असेही नेतन्याहू यांनी सांगितले. मोसाद या गुप्तचर यंत्रणेच्या एका कार्यक्रमात बोलताना नेतन्याहू यांनी याबाबत भाष्य केले.
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी? हमासकडून हजारो रॉकेटची निर्मिती सुरू
अस्तित्वासाठी लढण्याचा पर्याय आम्ही स्वीकारू
नेतन्याहू पुढे बोलताना म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंध चांगले आहेत. मात्र, इस्रायच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यासाठी मैत्री पणाला लागली, तर अस्तित्वासाठी लढण्याचा पर्याय आम्ही स्वीकारू, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेसारख्या चांगल्या मित्राशी वैर घेण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवस शांततेत गेल्यानंतर आता पुन्हा एकदा हमास इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तासनिम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा करणाऱ्या हमासकडून पु्न्हा एकदा हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हमासने पुन्हा एकदा रॉकेटचे उत्पादन सुरू केले असल्याचे वृत्त आहे. पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासने इस्रायलविरोधात झालेल्या हल्ल्यात जवळपास तीन हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.