इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. यावेळी त्यांच्या भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभाव दिसून आला. स्वच्छतेला धर्माशी जोडत इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये स्वच्छता अभियान सुरु करण्यात येईल आणि 50 लाख कमी बजेटमधील घरे बांधली जातील.
स्वच्छता म्हणजे एकप्रकारे निम्मा धर्म आहे. संपूर्ण पाकिस्तानात स्वच्छता अभियान राबविले पाहिजे, कारण पाकिस्तान स्वच्छता आणि सुंदरतेच्या मुद्यावरुन युरोपीयन देशांशी सामना करु शकेल, असे इम्रान खान म्हणाले. याचबरोबर, पंतप्रधान यांच्या बंगल्यात 524 कर्मचारी, 80 गाड्या आणि 33 बुलेट प्रूफ गाड्या आहेत. याशिवाय हेलिकॉप्टर आणि विमान आहे. तसचे, मुख्यमंत्री, गव्हर्नर, कमिश्नर यांच्याकडे मोठे-मोठे बंगले आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर देशातील गरीब जनतेच्या डोक्यावर छप्पर नसल्याची नाराजी व्यक्त करत पाकिस्तानमधील नागरिकांना 50 लाख कमी बजेटमधील घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी इम्रान खान यांनी सांगितले. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून 'स्वच्छ भारत स्वस्थ भारत'चा नारा दिला आहे. तसेच, देशातील प्रत्येक गरीब जनतेला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवाज योजना सुरु केली आहे.
इम्रान खान यांनी गेल्या शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते.
जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपले मताधिक्य संसदेत दाखवले. यावेळी इम्रान खान यांना 176 मते मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मते मिळाली.