इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या सरकारमधील मित्रपक्ष एक-एक करून विरोधकांच्या गोटात जात आहेत. यामुळे इम्रान कमजोर पडत चालले आहेत. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच खान राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र यातच, इम्रान खान यांच्या जीवाला धोका असून, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे वृत्त येत आहे. महत्वाचे म्हणजे, हा दावा खुद्द खान यांचे निकटवर्तीय तथा माजी मंत्र्याने केला आहे.
इम्रान खान यांचे निकटवर्तीय, पाकिस्तानचे माजी जलसंपदा मंत्री तथा PTI चे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनी इम्रान खान यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. खान यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यासाठी योजना तयार करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, आपल्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाला परदेशातून फंडिंग होत आहे, असा दावा इम्रान खान यांनी 27 मार्चला इस्लामाबादमध्ये झालेल्या पीटीआयच्या रॅलीत केला होता. यानंतर, आता खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या दाव्यांने पाकिस्तानचा राजकीय पारा आणखी वाढला आहे.
किती मतांनी कोसळणार सरकार?पाकिस्तान विधानसभेत एकूण 342 सदस्य आहेत. अशा स्थितीत इम्रान यांना बहुमतासाठी 172 सदस्यांची गरज आहे. मात्र एमक्यूएमने इम्रान खान यांची साथ सोडल्यानंतर आता विरोधकांकडे 177 सदस्यांचा पाठिंबा असेल. तर इम्रान खान यांच्याकडे केवळ 164 सदस्यच शिल्लक आहेत.