जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाला सुद्धा कोरोनावर मात करणे, अवघड जात आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच न्यूझीलंडमधून एक चांगली बातमी समोर आली आहे.
न्यूझीलंड हा कोरोना मुक्त देश झाला आहे. न्यूझीलंडमधील एका रूग्णालयात दाखल झालेला कोरोनाचा शेवटचा रुग्णही बरा झाला असून त्याला घरी पाठवण्यात आले आहे. गेल्या 17 दिवसांपासून देशात एकही कोरोनाची रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सोमवारी यााबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आता देशात कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आली आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, सामाजिक आणि आर्थिक निर्बंध हटविण्याची घोषणा करताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी आता हा देश सामान्य स्थितीत परत येईल. यासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले. याशिवाय, आमचे काम अजून संपलेले नाही. आम्ही कोरोना व्हायरसचा संसर्ग पूर्णपणे थांबवला आहे, मात्र, आमचे प्रयत्न या दिशेने सुरूच राहतील, असे जेसिंडा आर्डर्न म्हणाल्या. तसेच, देशात कोरोनाचे प्रकरण शून्य आहे. या वृत्ताने मला खूप आनंद झाला आणि त्यावेळी मी डान्स केला, असेही जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या जगभरात 71 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. जगभरात 4.04 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण 1154 जणांना झाल्याची नोंद आहे. जवळपास 50 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील सरकारने घेतलेली कठोर पावले महत्त्वपूर्ण मानली जातात. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सुरुवातीच्या काळात देशाच्या सर्व सीमा सील करून कडक नियम लागू केले होते.
आणखी बातम्या...
सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!
अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती