वुहान (चीन): पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. स्थानिक वेळेनुसार मोदी रात्री साडे बारा वाजता चीनमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात मोदी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांची भेट अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही नेत्यांची भेट होईल. 2014 मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमात मोदी आणि जिनपिंग यांची पहिली भेट झाली होती. चीन दौऱ्यात मोदी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत. यावेळी जागतिक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि चीनचे संबंध अतिशय तणावपूर्ण स्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या वर्षी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य जवळपास 73 दिवस आमनेसामने उभं ठाकलं होतं. यानंतर हा तणाव निवळला. मात्र तरीही अरुणाचल प्रदेशातील चीनची घुसखोरी थांबलेली नाही. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा दौरा चीनच्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहे. त्यामुळेच तिन्हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी सरकार आणि प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. डोकलाममध्ये गेल्या वर्षी निर्माण झालेली स्थिती आणि सध्याचे तणावपूर्ण संबंध या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे.
मोदी चीनमध्ये दाखल; उद्या घेणार अध्यक्ष जिनपिंग यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:10 PM