पंतप्रधाननरेंद्र मोदी सोमवारी ब्रुनेई येथे पोहोचले. विमानतळावर क्राउन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलीच द्विपक्षीय दौरा आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे.
अनिवासी भारतीयांकडूनही स्वागत -पंतप्रधान मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे पोहोचले. येथे ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. तेथे अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी हॉटेलबाहेर उपस्थित लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या.
पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते म्हणाले, "ब्रुनेई आणि सिंगापूर हे भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणात आणि इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीकोनात महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे केवळ दोन देशांसोबतच नव्हे, तर मोठ्या आसियान क्षेत्रासोबतची भारताची भागीदारी आणखी मजबूत होईल."
या मुद्द्यांवर होणार चर्चा? - परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेई दौऱ्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामुळेच त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सेमीकंडक्टर सहकार्य - पंतप्रधान मोदी तेथील सुल्तानांसोबत बोलताना सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील.
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक - भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात 270 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीसंदर्भात तेथील सुलतानांसोबत चर्चा करतील.
हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायूची आयात -भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करतो. सध्या भारत नैसर्गिक वायूची आयात वाढविण्यावर भर देत आहे. अशात पंतप्रधान मोदी या विषयावरही विशेष चर्चा करू शकतात, असे मानले जात आहे.
म्यानमारच्या परिस्थितीवर चर्चा - पीएम मोदी सुल्तान हसनल बोल्किया यांच्यासोबत म्यानमारच्या स्थितीवरही चर्चा करू शकतात.