वॉशिंग्टन - न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियलसमोर ही घटना घडली. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. 'दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे', असा शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे.
नेमकं काय घडलं न्यू-यॉर्कमध्ये ?मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रक ड्रायव्हरनं पादचारी व सायकल लेनमधील लोकांच्या अंगावर भरधाव ट्रक चालवला. या घटनेत जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला असून कित्येकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. सेफुलो सायपोव्ह असे या हल्लेखोराचं नाव असून त्याचं वय 29 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला करण्यामागे नेमके कारण काय होते, याबाबतीच माहिती अद्यापपर्यंत हल्लेखोरानं दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून काही अंतरावरच स्टुवेन्सेंट हाय स्कूल आहे. वेळीच हल्लेखोराला अटक करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात हल्लेखोराकडून एक बनावट बंदूक आणि एक पॅलेट गनही सापडली आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी पाच-सहा राऊंड गोळीबाराचा आवाजही ऐकला.
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. 'आता पुरे झाले, आयसिसला अमेरिकेत येऊ देणार नाही. घटना अतिशय दुर्देवी असून पुन्हा विकृत मानसिकतेतून झालेला हा भ्याड हल्ला आहे', असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.