न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना गौरवण्यात आलं. स्वच्छतेसाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना यासाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीनं मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं गौरवण्यात आल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. हा माझा एकट्याचा सन्मान नसून कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले. कोट्यवधी भारतीयांनी स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. महात्मा गांधींनी स्वच्छतेचं स्वप्न पाहिलं होतं. ते आता पूर्ण होत आहे. एखादं गाव स्वच्छ होईल, तेव्हाच त्या गावाला आदर्श म्हणता येईल, असं महात्मा गांधी म्हणाले होते. मात्र आता आम्ही एक गाव नव्हे, तर संपूर्ण देशच स्वच्छ करण्याकडे वाटचाल करत आहोत, असं मोदींनी म्हटलं. गेल्या पाच वर्षात स्वच्छतेसाठी अनेक पावलं उचलण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. पाच वर्षांमध्ये ११ कोटी शौचालयं बांधण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. अनेकांच्या प्रतिष्ठेचं त्यामुळे रक्षण झालं, असं मोदींनी म्हटलं. भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेतही पाच वर्षात सुधारणा झाली. यामध्येही स्वच्छ भारत योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं मोदी म्हणाले. स्वच्छतेमुळे लहान मुलांमधील हृदयाशी संबंधित समस्यांचं प्रमाण कमी झाल्याचंदेखील पंतप्रधानांनी म्हटलं. यावेळी त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अहवालाचा संदर्भ दिला.