माले : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मालदीवच्या दौऱ्यावर गेले आहेत. मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवच्या 'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदींना हा सन्मान बहाल केला. परदेशी लोकप्रतिनिधींना मालदीवकडून दिला जाणारा 'निशान इज्जुद्दीन' हा सर्वोच्च सन्मान आहे.
मालदीवच्या सर्वोच्च सन्मानाने आज माझा गौरव करुन आपण मलाच नाही तर, संपूर्ण भारताचा गौरव केला आहे, असा शब्दांत नरेंद्र मोदींनी 'निशान इज्जुद्दीन' सन्मान स्वीकारताना आपल्या भावना केल्या. तसेच, 'निशान इज्जुद्दीन' हा सम्मान माझाच नाही तर दोन्ही देशांतील मैत्री आणि घनिष्ठ संबंधांचा सन्मान आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, 'भारत कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक संकटात मालदीवसोबत असेल. दोन्ही देशांच्या नागरिकांना विकास आणि स्थिरता हवी आहे. मालदीवमध्ये विकासाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. आपल्या द्विपक्षी सहकार्यामुळे भावी दिशा ठरेल. दोन्ही देशाच्या लोकांचा संपर्क वाढविण्यासाठी आम्ही दोन्ही देशांदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी परस्पर सहमती जाहीर केली आहे,' असे यावेळी नरेंद्र मोदी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदींचा हा दुसरा मालदीव दौरा आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी मागील वर्षी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीसाठी मालदीवला गेले होते. 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भूटानला गेले होते.