Israel Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel Hamas War) यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी (1 डिसेंबर) इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग (Isaac Herzog) यांची भेट घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन समस्येवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून लवकर आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारताचे समर्थन असल्याचे सांगितले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये COP28 जागतिक हवामान शिखर परिषदेच्या वेळी या दोन नेत्यांची भेट झाली.
काय संवाद झाला?परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाधित लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचवण्याचा पुनरुच्चार केला. तसेच, इस्रायल-हमास संघर्षावरही चर्चा केल्याची माहिती बागची यांनी दिली.
आयझॅक हरझोग काय म्हणाले?हरझोग म्हणाले, COP28 परिषदेत मी जगभरातील अनेक नेत्यांना भेटलो. मी त्यांच्याशी हमासने युद्धविराम कराराचे उल्लंघन कसे केले, याबद्दल माहिती दिली आणि ओलिसांची सुटका आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अजेंडाच्या शीर्षस्थानी ठेवण्याच्या माझ्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा आदर करण्यावरही त्यांनी भाष्य केले.