PM Modi Italy Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या, म्हणजेच 13 जून रोजी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या(Italy) दौऱ्यावर जाणार आहेत. पण, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान समर्थकांनी इटलीतीलमहात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तान समर्थकांनी गांधींच्या पुतळ्यावर हरदीप सिंग निज्जरचा उल्लेखही केला.
इटलीमध्ये 13 ते 15 जून दरम्यान G7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यापूर्वी खलिस्तानी समर्थकांनी इटलीत हे निंदणीय कृत्य केले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महात्मा गांधींचा पुतळा तोडल्याचे आणि त्यावर हरदीप सिंग निज्जरचा उल्लेख केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीचा मुद्दा भारताने इटलीसमोर उपस्थित केल्यानंतर पुतळ्याची दुरुस्तीही करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत आम्ही इटालियन अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक ती कारवाई करण्याचे सांगितले आहे.
13 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो उपस्थित राहणार आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी 13 जून रोजी इटलीला रवाना होतील आणि 14 जूनच्या संध्याकाळी उशिरा परततील. पंतप्रधानांसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असेल, ज्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि NSA अजित डोवाल यांचा समावेश असू शकतो. G-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, ज्यामध्ये इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी भेट होईल.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी शिखर परिषदेदरम्यान झेलेन्स्की, तसेच इतर जागतिक नेत्यांशी संवाद साधला. G-7 मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे. इटलीकडे सध्या G7 चे अध्यक्षपद आहे.