दार-ए-सलाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी केनियाला रवाना झाले. चार देशांच्या आपल्या आफ्रिका दौऱ्यात केनिया हा शेवटचा देश आहे. टांझानियाचा दौरा छोटा असला तरी फलदायी ठरला, असे टिष्ट्वट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी केले. मोदी शनिवारी रात्री टांझानियात आले. त्यांनी अध्यक्ष जॉन पोम्बे जोसेफ मॅगुफिल यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. टांझनियाशी भारताने पाच करार केले असून, टांझानियाच्या विकासाच्या गरजा भागविण्यासाठी भारत पूर्ण सहकार्य करील, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी येथे यायच्या आधी मोझाम्बिक आणि दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. मोदी यांनी ‘सोलार ममाज्’चीही भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रामीण भागातील या महिला भारत सरकारने राबविलेल्या कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आहेत. या प्रशिक्षणात त्यांना सौरदिवे कसे तयार करतात, बसवतात, त्यांचा वापर, दुरुस्ती आणि घरात वापरायच्या सौरऊर्जेवरील साधनांची माहिती त्यांच्या खेड्यांत देण्यात आली.
पंतप्रधान मोदी केनियाला रवाना
By admin | Published: July 11, 2016 4:22 AM