बिश्केकः पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस बिश्केकच्या दौऱ्यावर होते, त्यादरम्यान त्यांनी एससीओच्या परिषदेत उपस्थित लावली, एससीओ परिषदेतून मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच बिश्केकमध्येही मोदीचं स्वागत आणि सन्मान करण्यात आला असून, त्याचीच सगळीकडे चर्चा होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा किर्गिस्तानच्या राष्ट्रपतींच्या आदरभावानं प्रभावित झाले आहेत.एससीओ परिषदेदरम्यान जेव्हा अचानक पाऊस आला, त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांऐवजी किर्गिस्तानचे राष्ट्रपती सुरोनबे जीनबेकोव यांनी मोदींसाठी स्वतः छत्री सांभाळली, मोदींना त्या छत्रीतूनच त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचवले. खरं तर जागतिक नेत्यांसाठी असं काम सुरक्षा कर्मचारी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा एससीओ परिषदेत सहभागी होण्यासाठी बिश्केकमध्ये पोहोचले, तेव्हा किर्गिस्तानचे राष्ट्रपतींनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. राष्ट्रपतींनी मोदींसाठी पकडलेल्या छत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गेले होते, तेव्हा असं दृश्य पाहायला मिळालं होतं. कोलंबोमध्ये जेव्हा पाऊस कोसळू लागला तेव्हा राष्ट्रपाती मैत्रीपाल सिरिसेनांनी अन्य अधिकाऱ्यांऐवजी स्वतः मोदींची छत्री सांभाळली.पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रोटोकॉल बाजूला ठेवून मिळालेल्या या सन्मानाला कूटनीतीच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. दोन दिवसांपूर्वी बिश्केकमध्ये झालेल्या एससीओच्या परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेण्याचे किंवा नजरानजर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळले होते. मात्र, शुक्रवारी रात्री मोदींनी इम्रान खान यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकलेला नसला तरीही खान यांनी शुभेच्छा दिल्याचे समजते. या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी इम्रान खानला भेटणार नसल्याचे भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. परिषदेमध्ये मोदी आणि इम्रान खान एकाच डिनर टेबलवर होते. मात्र मोदींनी खान यांच्याशी संवाद साधला नाही. मोदींनी त्यांच्याकडे पाहणंदेखील टाळले होते.
....जेव्हा दोन देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी छत्री पकडतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 3:48 PM