क्वालालंपूर- तीन देशांच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही वेळासाठी मलेशियाला भेट दिली. मलेशियात नुकतेच निवडून आलेले पंतप्रधान महाथिर महंमद यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा ही केली. महाथिर महंमद हे जगातील सर्वात वयोवृद्ध निर्वाचित पंतप्रधान आहेत. क्वालालंपूर येथे उतरल्यावर पुत्रजया येथे पेर्देना पुत्र कॉम्प्लेक्स येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाथिर महंमद यांची भेट घेतली. महाथिर यांचे अभिनंदन केल्यानंतर उपपंतप्रधान वॅन अझिझा यांची भेट त्यांनी घेतली. मलेशियामध्ये आपले स्वागत केल्याबद्दल महाथिर यांचे आभार मानणारे ट्वीटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर ते सिंगापूरसाठी रवाना झाले.
सिंगापूरमध्ये अर्थ, कौशल्यविकास, नगरनियोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा अनेक विषयांवर त्यांची चर्चा होईल आणि ते काही निवडक उद्योगांच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतील. शुक्रवारी ते राष्ट्रपती हालिमा याकोब यांची भेट घेतील व पंतप्रधान ली सिन लूंग यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करतील. या भेटीनंतर ते नानयांग तंत्रज्ञान विद्यापिठाला भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी शांग्री ला संवाद परिषदेत सहभागी होतील. 1 जून रोजी क्लीफर्ड पियर येथे एका कोनशिलेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. येथे महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन झाले होते.
इंडोनेशियन नागरिकांना 30 दिवसांचा फ्री व्हीसापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली. इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रणही त्यांनी दिले.तत्पूर्वी, इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला व इंडोनेशियाने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या लढाईत भारत त्याच्यामागे ठामपणे राहील, अशी ग्वाही दिली.