तेल अवीवः इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होत असून, त्यासाठी बेंजामिन नेतन्याहूंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नेतन्याहूंच्या लिकुड पक्षानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालवला आहे. लिकुड पक्षाच्या जाहिरातबाजीत नेतन्याहूंबरोबर मोदी पोस्टरमध्ये झळकतायत. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर नेतन्याहू असलेले पोस्टरही जागोजागी लावण्यात आले आहेत. तेल अवीवच्या किंग जॉर्ज रस्त्यावर लिकुड पक्षाचं मुख्यालय आहे, तिथे या तिन्ही आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर नेतन्याहूंची जवळीक असल्याचं दाखवण्याचा जाहिरातीतून प्रयत्न केला आहे.नेतन्याहू यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांचा निवडणुकीत वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक काळ इस्रायलचे पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे. त्याच्याच कार्यकाळात भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक, लष्कर आणि राजकीय संबंध वेगानं वृद्धिंगत झाले आहेत. मोदींच्या 2019च्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुभेच्छा देणारे ते पहिले नेते आहेत. नेतन्याहू निवडणुकीच्या 8 दिवस अगोदरच 9 सप्टेंबरला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेतन्याहूंचा वाईट काळ सुरू असून, मोदींबरोबर फोटो खेचल्यानं आपल्याला फायदा होईल, अशी त्यांना आशा आहे, इस्रायलचे लेखक योसी वर्टर यांनी यासंदर्भात एक लेखही लिहिली आहे.
इस्रायल निवडणुकीत नेतन्याहूंना मोदींचा आधार, पोस्टरमध्ये दोघांचे हातात हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 9:12 AM