गळाभेट, खांद्यावर हात...PM मोदी अन् राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:22 PM2024-08-23T15:22:09+5:302024-08-23T15:22:53+5:30
PM Modi Ukraine Visit : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
PM Narendra Modi in Ukraine : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यानंतर आज युक्रेनमध्ये पोहोचले. एका विशेष ट्रेनद्वारे सुमारे दहा तासांच्या प्रवासानंतर ते राजधानी कीवमध्ये दाखल झाले. स्टेशनवर अनेक भारतीयांनी पीएम मोदींचे जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पीएम मोदी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
#Watch | PM @narendramodi and President Zelenskyy honour the memory of children at Martyrologist Exposition#PMModiInUkraine@meaindia@pmoindiapic.twitter.com/KCOqfGb85z
— DD News (@DDNewslive) August 23, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पीएम मोदी सात तास युक्रेन राहतील आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धासह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची अधिकृत चर्चा होईल. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मारिन्स्की पॅलेस पूर्णपणे सजवण्यात आला आहे.
Reached Kyiv earlier this morning. The Indian community accorded a very warm welcome. pic.twitter.com/oYEV71BTlv
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2024
झेलेन्स्की यांच्या भेटीपूर्वी मोदींनी कीवमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. 2020 मध्ये महात्मा गांधींच्या 151 व्या जयंतीनिमित्त हा पुतळा बसवण्यात आला होता. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह युक्रेन नॅशनल म्युझियममध्ये रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, मोदी आणि झेलेन्स्की यांच्या भेटीत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. याशिवाय, युक्रेन आणि भारत यांच्यात अनेक दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे.
पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांची चौथी भेट
भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कीव आणि नवी दिल्ली यांच्यातील राजनैतिक संबंध 30 वर्षांपूर्वी, म्हणजे 1994 मध्ये प्रस्थापित झाले. तसेच, पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांची ही चौथी भेट आहे. मोदी आणि झेलेन्स्की यांची पहिली भेट नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाली होती. त्यावेळी ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांची COP26 हवामान परिषद भरली होती. या परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाली. यानंतर, दुसरी भेट 2023 मध्ये जपानच्या हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेत झाली. तिसरी भेट 14 जून 2024 रोजी इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत झाली.