PM Modi US Visit, President Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायडेनशी भेट घेतल्यानंतर लगेचच बायडेन यांनी हे विधान केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 'अलीकडेच शी जिनपिंग यांच्या चीनचा एक संशयित गुप्तहेर बलून ज्यामध्ये अमेरिकेच्या हद्दीत घुसला होता आणि एका अमेरिकन लढाऊ विमानाने तो बलून खाली पाडला. त्या घटनेमुळे जिनपिंग सध्या खजील आहेत, असेही वक्तव्य जो बायडेन यांनी केले. चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष नवा नाही. पण हे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या (PM Modi US Visit) दरम्यान आले आहे. त्यामुळे या भूमिकेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री कॅलिफोर्नियामध्ये एका समारंभात जो बायडेन म्हणाले की, नुकताच अमेरिकेत घुसलेला संशयित चिनी गुप्तहेर बलून अमेरिकन फायटर जेटने पाडला होता, या तणावामुळे शी जिनपिंग खजील झाले आहेत. अध्यक्ष बायडेन म्हणाले, 'शी जिनपिंग खूप अस्वस्थ का झाले, जेव्हा मी गुप्तहेर उपकरणांनी भरलेल्या दोन बॉक्ससह तो फुगा खाली पाडला. कारण तेव्हा त्यांना माहित नव्हते की तो गुप्तहेर बलून इथे पोहोचला आहे. हुकूमशहांसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ते खजील आहेत.
बायडेन यांच्या वक्तव्यावर चीनचे प्रत्युत्तर
जो बायडेन यांच्या वक्तव्यावर चीनने हल्ला चढवला असून अमेरिकेचे वक्तव्य बेजबाबदार आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी जो बायडेन यांनी शी जिनपिंग यांची हुकूमशहाशी केलेली तुलना हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की अमेरिकेच्या बाजूने संबंधित टिप्पण्या अत्यंत हास्यास्पद आणि बेजबाबदार आहेत आणि ते मूलभूत तथ्ये, राजनैतिक प्रोटोकॉल आणि चीनच्या राजकीय प्रतिष्ठेचे उल्लंघन करत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी एक दिवस आधी जिनपिंग यांची भेट घेतली होती
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर जो बायडेन यांचे हे वक्तव्य आले आहे. अँटोनी ब्लिंकन यांची सोमवारी बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांच्याशी झालेली भेट हा दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता. शी जिनपिंग यांची भेट घेणारे ते सर्वोच्च स्तरीय यूएस मुत्सद्दी आहेत.
स्पाय फुग्यामुळे ब्लिंकनचा यांचा दौरा पुढे ढकलला!
जो बायडेन आणि शी जिनपिंग यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेच्या बाजूला अध्यक्ष म्हणून प्रथमच वैयक्तिक भेट घेतली. ब्लिंकेनची भेट मूळत: दोघांच्या भेटीनंतर फेब्रुवारीमध्ये नियोजित होती. मात्र, संशयित चिनी हेरगिरीचे फुगे सापडल्यानंतर दौरा पुढे ढकलण्यात आला.