नवी दिल्ली-
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारत संकटमोचक म्हणून धावून आला आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं या वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेला २५० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १९ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे. ते म्हणाले की, भारत श्रीलंकेला मदत करण्यासाठी खंभीरपणे उभा आहे.
आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शनिवारीच भारतानं ४० हजार मेट्रिक टन डिझेलची खेप श्रीलंकेला पाठवली. भारताकडून अशी ही चौथी मदत आहे. गोपाल बागले म्हणाले की, या चार खेपांमध्ये १५०,००० मेट्रिक टनांहून अधिक जेट इंधन, डिझेल आणि पेट्रोल श्रीलंकेला नेण्यात आले आहे.
१ अब्ज डॉलर क्रेडिट लाइन जाहीरभारतानं श्रीलंकेला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचं मान्य केलं आहे. यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत भारतातून तांदळाची खेप श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तिथल्या तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे, ज्याचे दर गेल्या वर्षभरात दुपटीनं वाढले आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) चर्चा करत आहे.
श्रीलंकेत देशभर संचारबंदी लागूदरम्यान, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली देशात आणीबाणी जाहीर करणे ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची सबब ठरू नये, असा इशारा लंडनच्या मूलभूत हक्कांवर देखरेख ठेवणाऱ्या अॅम्नेस्टी वॉचडॉगने श्रीलंका सरकारला दिला. श्रीलंकेत देशव्यापी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे, जो शनिवारी सकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असेल. श्रीलंकेत विजेच्या भीषण संकटामुळे महागाई शिगेला पोहोचली आहे.
श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पुरवठा आणि वीज कपात यामुळे श्रीलंकेत अशांतता पसरली आहे.