पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाय़डेन कुटुंब आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योगपतींसोबत डिनरचा आनंद घेतला. याआधी त्यांनी जनतेला संबोधित केलं. याच दरम्यान स्पायडरमॅन, नाटू नाटू डान्स, बेसबॉल आणि क्रिकेटबद्दलही भाष्य केलं आहे. बायडेन हे बोलण्यात सॉफ्ट आहेत पण निर्णय घेण्यास स्ट्राँग आहेत. जसजसा वेळ जात आहे तसतसे आपले लोक एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढवत आहेत, ते एकमेकांची नावं बरोबर उच्चारण्यास सक्षम आहेत असं नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात सांगितलं आहे.
मोदी म्हणाले की, "आता भारतातील मुलं हॅलोविनला स्पायडरमॅन बनतात आणि अमेरिकेतील तरुण नाटू-नाटू गाण्यावर डान्स करतात. बेसबॉलची लोकप्रियता असताना आता क्रिकेट देखील अमेरिकेत लोकप्रिय होत आहे. या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी अमेरिकेचा संघ जोरदार प्रयत्न करत आहे. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. दोन्ही देशातील लोकांच्या उपस्थितीने ही संध्याकाळ खास बनली आहे. ही आमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत. भारतीय वंशाचे अमेरिकन सर्व क्षेत्रात छाप सोडत आहेत."
ज्यो बायडेन यांचे डिनरसाठी मानले आभार
पंतप्रधानांनी ज्यो बायडेन यांचे डिनरसाठी आभार मानले. ते म्हणाला की, "तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी, खास पाहुण्यांसाठी उघडलेत. पाहुणचाराने प्रभावित होऊन बरेचदा लोक गाणं म्हणू लागतात हे मी पाहिलं आहे. जर माझ्याकडेही गाण्याची कला असती तर मी गाणं म्हटलं असतं. जपानमधील क्वाड समिटमध्ये तुम्ही मला एक समस्या सांगितली होती. मला खात्री आहे की तुम्ही ती समस्या सोडवली असेल. येथे येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी जागा असेल."
मोदींनी त्यांच्या 2014 च्या दौऱ्याचाही उल्लेख केला. "मिस्टर प्रेसिडेंट! 2014 मध्ये तुम्ही माझ्यासाठी मेजवानीचे आयोजन केलं होतं, तेव्हा योगायोगाने माझा नवरात्रीचा उपवास चालू होता. मला आठवतंय की, उपवासात मी काहीच खाणार नाही का? हे तुम्ही मला वारंवार विचारत होतात पण मला काहीही खाणं शक्य नव्हतं आणि त्यावेळी तुम्ही माझी खूप काळजी घेत होतात. त्यावेळेस तुम्हाला मला प्रेमाने काहीतरी खायला घालायचं होतं, आज ती इच्छा पूर्ण होत आहे असं वाटतं असं" देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.