ढाका:पंतप्रधाननरेंद्र मोदी (pm narendra modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेश येथे दाखल होताच पंतप्रधान मोदींना बंदुका आणि तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली. (pm narendra modi addressed in dhaka on occasion of bangladesh freedom 50th anniversary)
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
बांगलादेश आणि भारताचे संबंध दृढ
बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे. बांगलादेशला २० लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. या कठीण प्रसंगात बांगलादेशप्रमाणे अनेक देशांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा राहिला. यापुढेही बांगलादेशला कोरोना लसीचा पुरवठा केला जाईल, असे मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदींचे कौतुक
पूर्व सीमेबाबत भारत निश्चिंत आहे. कारण भारतासोबत बांगलादेश उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी मदत मिळाली, असे कौतुकोद्गार बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी काढले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. मतुआ समाजाच्या मंदिरात पूजन केल्यानंतर ढाका येथे काही युवकांची भेटही पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली.