वॉशिंग्टन:पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या या महिन्यातील अमेरिका दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांसाठी नवा अध्याय ठरेल आणि संरक्षण, औद्योगिक सहकार्य, भारताचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या जातील, तसेच भारताच्या लष्करी ताफ्यात वाढ होण्याची शक्यता पेंटागॉनने व्यक्त केली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या महिन्यात २१ जूनपासून अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
“जेव्हा पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस वॉशिंग्टनला भेट देतील, तेव्हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नवे मानदंड प्रस्थापित करणारी ही ऐतिहासिक घटना ठरेल,” असा विश्वास इंडो-पॅसिफिक सुरक्षा प्रकरणांचे सहाय्यक संरक्षण सचिव एली रॅटनर यांनी एका चर्चेदरम्यान व्यक्त केला. मोदींच्या या दौऱ्याकडे अमेरिका-भारत संबंधांमध्ये खरी झेप म्हणून लोक पाहतील,’ असेही ते म्हणाले.
भर नेमका कशावर?
“संरक्षणाशी संबंधित बाबींमध्ये सह-उत्पादनाच्या मुद्द्यावर स्पष्ट धोरणात्मक योजना तयार करणे ही या भेटीची प्राथमिकता असेल, भारताची स्वदेशी संरक्षण औद्योगिक संरचना मजबूत करण्यासोबतच लष्करी आधुनिकीकरणाला गती देणे हे पंतप्रधान मोदींचे प्राधान्य आहे,’ असेही त्यांनी सांगितले.