PM Modi Japan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदीजपान दौऱ्यावर आहेत. जपान येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होत आहेत. जपान अमेरिका व्यतिरिक्त ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इटली तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत डिजिटायझेशन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त कनेक्टिव्हिटी, सुरक्षा, आण्विक नि:शस्त्रीकरण, आर्थिक सुरक्षा, प्रादेशिक समस्या, हवामान बदल, अन्न आणि आरोग्य आणि विकास या विषयांवर चर्चा होईल. याच कार्यक्रमातील एका बैठकीच्या आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जी-७ च्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सहभागी झाले आहेत. एका सत्रात पंतप्रधान मोदी हेदेखील सहभागी झाले. यातच जो बायडन स्वतःहून पंतप्रधान मोदी यांच्या आसनापाशी आले. पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही प्रमुखांची गळाभेट झाली. अवघ्या काही सेकंदांची ही भेट होती. मात्र, जो बायडन यांनी स्वतःहून येऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणे हा विषय चर्चेचा ठरल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे चीनची चिंता वाढेल, असे बोलले जात आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण
G-7 शिखर परिषदेतील कार्यक्रमांना हजेरी लावण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हिरोशिमामधील महात्मा गांधींचा पुतळा अहिंसेचा विचार पुढे नेईल. जपानच्या पंतप्रधानांना भेट दिलेला बोधी वृक्ष हिरोशिमा येथे लावला गेला आहे. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. येथे येणाऱ्या लोकांना शांततेचे महत्त्व समजेल, असे मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, महात्मा गांधींचा पुतळा पद्मभूषण पुरस्कारप्राप्त राम वानजी सुतार यांनी बनवला आहे. मोटोयासू नदीच्या काठावर ऐतिहासिक ए-बॉम्ब डोमजवळ हा पुतळा बसवण्यात आला आहे, जिथे दररोज हजारो पर्यटक येतात.