नवी दिल्ली : काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे, असे मत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. तसेच, यावेळी जागतिक मुद्यांवर चर्चा केली. याशिवाय दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके आहे. यांचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
ब्यूनस आयर्स मध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेच्या अनौपचारिक बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दहशतवाद आणि आर्थिक गुन्ह्याविरोधात एकजूट हाण्याची गरज असल्याचे म्हटले. ते म्हणाले, दहशतवाद आणि कट्टरवाद जगासमोरील एक मोठा धोका आहे. त्याचबरोबर आर्थिक गुन्हा करणाऱ्यांचाही धोका आहे. आपण काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्व विकसनशील देशांना एकजुट होण्याचे आवाहन केले. आपल्याला संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय संघटनांशी विकसनशील देशांच्या हितासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळेच आपण ब्रिक्ससाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जी- 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील विविध देशांच्या प्रमुखांची भेट घेतली.या परिषदेत रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन, जर्मनीच्या चॅन्सलेर एंजेला मार्केल आदी उपस्थित होते.