अबूधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त अरब अमिराती(United Arab Emirates) या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी यूएईबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यूएईचा ‘ऑर्डर ऑफ झायद’ (Order Of Zayed) या पुरस्काराने मोदींचा गौरव झाला असून, या पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी पहिले भारतीय ठरले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूएईच्या बाजारात रुपे (RuPay) कार्ड सादर केलं असून, दुकानदार आणि व्यावसायिकांना भारताशी जोडण्यासाठी याचा फायदा होणार आहे. संयुक्त अरब अमिरात पश्चिम आशियातला असा पहिला देश म्हणून समोर आला आहे, ज्यानं भारताची इलेक्ट्रॉनिक प्रणाली स्वीकारली आहे. भारतानं यापूर्वी सिंगापूर आणि भूतानमध्ये रुपे कार्ड चालवण्यास सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी यूएईमध्ये सांगितलं की, भारतानं आपल्या राजकीय स्थिरता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर आज देशभरातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायद’ने गौरवान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 5:23 PM