PM Modi in Quad Summit 2023: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजपान दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी क्वॉड देशांच्या शिखर परिषदेत सहभाग घेतला. तसेच २०२४ मध्ये होणारी क्वॉड देशांची शिखर परिषद भारतात होईल. त्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. जपानच्या हिरोशिमा शहरात G-7 शिखर परिषदेच्या अंतर्गत आयोजित क्वॉड देशांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. २०२४ मध्ये भारतात क्वाड परिषद आयोजित करताना आम्हाला आनंद होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्वाड परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी क्वाड समूह एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. इंडो-पॅसिफिक हे व्यापार, संधोधन आणि विकासाचे इंजिन आहे, यात काही शंका नाही. इंडो-पॅसिफिकची सुरक्षा आणि यश केवळ या क्षेत्रासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचे आहे, यावर आमचे एकमत आहे. रचनात्मक अजेंडा घेऊन आम्ही लोकशाही मूल्यांच्या आधारे पुढे जात आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी केले ऑस्ट्रेलियांच्या पंतप्रधानांचे अभिनंदन
या समूहातील देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी आम्ही मुक्त, खुला आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक आमच्या दृष्टीकोनाला व्यावहारिक परिमाण देत आहोत. या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. २०२४ मध्ये क्वाड नेत्यांची शिखर परिषद आयोजित करण्यात भारताला आनंद होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. क्वाड हा चार देशांचा समूह असून, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज म्हणाले की, मला पुन्हा जवळच्या मित्रांच्या भेटीने आनंद होत आहे. खुल्या, स्थिर, सुरक्षित तसेच समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी एकसंधपणे काम करत आहेत. हे असे क्षेत्र आहे जेथे सार्वभौमत्वाचा आदर केला जातो. प्रादेशिक समतोलामुळे मोठ्या आणि लहान सर्व देशांना याचा फायदा होतो. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मला वाटते की लोक आतापासून २० ते ३० वर्षांनंतरच्या क्वाड समूहाकडे पाहतील आणि म्हणतील की, बदल केवळ प्रदेशातच नाही तर जगातही गतिमान आहे. माझ्या मते, गेल्या दोन वर्षांत आपण चांगली प्रगती केली आहे, असे बाडयन यांनी नमूद केले.