PM Modi Europe Visit: "तो कोणता पंजा होता जो १ रुपयातून ८५ पैसे घासून घेत होता," पंतप्रधानांचा बर्लिनमधून काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:17 AM2022-05-03T06:17:18+5:302022-05-03T06:17:49+5:30
PM Modi Europe Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमध्ये राहत असलेल्या भारतीयांना संबोधित करताना नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला.
PM Modi Europe Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बर्लिनमध्ये भारतीयांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाच्या गतीपासून लोकल फॉर व्होकल, स्टार्टअप, डीबीटी सोबतच कलम ३७० हटवण्यापर्यंतच्या बाबींवर भाष्य केलं. तसंच यावेळी त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना वसुधैव कुटुंबकमचा संदेशही दिला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात 'भारत माता की जय'च्या जयघोषानं केली आणि जर्मनीत राहणाऱ्या भारतीयांना भेटणे हे आपलं भाग्य असल्याचं म्हटलं. "मी जर्मनीमध्ये यापूर्वीही आलोय. तुमच्यापैकी अनेकाची भेटही घेतली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग दिसतोय. जर्मनीत भारतीयांची संख्या भलेही कमी आहे, परंतु तुमच्या उत्साहात, स्नेहात कोणतीही कमतरता दिसत नाही. हे दृष्य जेव्हा भारतातील लोक पाहतात तेव्हा त्यांचंही मन अभिमानानं भरुन येतं," असं मोदी यावेळी म्हणाले.
जेव्हा कोट्यवधी भारतीयांबाबत बोललं जातं, तेव्हा त्यात केवळ भारतात राहणाऱ्या नाही, तर तुमचाही समावेश असतो. २१ व्या शतकातील ही वेळ भारतासाठी, भारतीयांसाठी खुप महत्त्वाची आहे. आज भारत एक संकल्प घेऊन पुढे जात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "सकारात्मक बदल आणि जलद विकासाच्या इच्छेमुळेच २०१४ मध्ये भारतच्या जनतेनं संपूर्ण बहुमतातलं सरकार निवडलं. २०१९ मध्ये त्यांनी देशाचं सरकार पहिल्यापेक्षाही मजबूत केलं, ही भारतीय जनतेची महान दूरदृष्टी आहे. मी मेहनत करून अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. भारतानं ठरवलंय आणि कुठे, कसं जायचं हेदेखील माहित आहे," असंही मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi greets members of the Indian community as he concludes his address to them at Theater at Potsdamer Platz in Berlin, Germany. pic.twitter.com/wtpGO80GX3
— ANI (@ANI) May 2, 2022
"राजकीय अस्थिरता संपवली"
"भारतानं तीन दशकांची राजकीय अस्थिरता एक बटण दाबून संपवली. ३० वर्षांनंतर भारतीय जनतेनं पूर्ण बहुमतातलं सरकार निवडलं. भारत नवी उंची गाठू शकतो. भारतीयांना मताची ताकत माहित आहे. भारत आहे वेळ गमावणार नाही. भारत जेव्हा स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरीकरत असेल, तेव्हा ज्या उंचीवर असेल, ते ध्येय गाठण्यासाठी भारत तेजीनं पुढे जात आहे. भारतात साधनांची, संसाधनांची कमतरता राहिली नाही," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
प्रत्येक क्षेत्रात प्रगती
भारत आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. यापूर्वी जिकडे तिकडे वर्क इन प्रोग्रेसचा बोर्ड लागलेला असायचा. आता देशही तोच आहे, फाईलही तिच आहे, सरकारी मशीनरीही तिच आहे, परंतु देश बदललाय. भारतात जलद इंटनेट कनेक्टिव्हीटी आहे. ६ लाख गावांना ऑप्टीकल फायबरनं जोडलं गेलंय. आता ५ जी देखील येतंय. रिअल टाईम पेमेंटमध्ये सर्वाधिक भागीदारी भारताचीच असल्याचं मोदी म्हणाले.
#WATCH | Today the way technology is being included in governance in India, it shows the political will of New India...Now no PM will have to say that I send Re 1 from Delhi but only 15 paise reaches (people): PM Modi in Berlin, Germany pic.twitter.com/JoOh03NN5o
— ANI (@ANI) May 2, 2022
"नवा भारत रिस्क घेतो"
"आमच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात लाभ लोकांच्या खात्यात पोहोचला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे शक्य झालं. कोणतीही कट मनी नाही. आता कोणत्याही पंतप्रधानांना हे म्हणावं लागणार नाही की मी १ रुपया पाठवतो, तर १५ पैसे पोहोचतात," असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. तो कोणता पंजा होता जो ८५ पैसे घासून घेत होता, असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच स्टार्टअपवर बोलताना त्यांनी २०१४ पूर्वी भारतात दोन-चारशे स्टार्टअप्स होतं असं सांगितलं. परंतु आता ६८ हजारांपेक्षा अधिक स्टार्टअप असल्याचं ते म्हणाले.
एक देश एक संविधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० चं नाव न घेता म्हटलं, की आम्ही एक देश एक संविधान आता कुठे जाऊन लागू केलं. यासाठी ७० वर्षे लागली. यावेळी त्यांनी वन नेशन वर रेशनचीही चर्चा केली आणि आम्ही ५ वर्षांच्या कालावधीत जुने १५०० कायदे कमी केल्याचं म्हटलं. "भारत आज ग्लोबल होतोय. आम्हाला लस तयार करण्यात यश मिळालं, त्यानंतर ती शंभरपेक्षा अधिक देशांना पाठवण्यात आली. आज जगात गव्हाची कमतरता आहे. भारतातील शेतकरी जगाचं पोट भरण्यासाठी पुढे आलाय. जेव्हा मानवतेसमोर संकट येतं, तेव्हा भारत त्यावर तोडगा काढून समोर येतो. हा नवा भारत आहे आणि ही नव्या भारताची ताकत आहे," असंही मोदींनी स्पष्ट केलं.