बर्लिन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) परदेश दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांना भेटी देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून झाली. बर्लिन येथे पोहोचल्यावर अनिवासी भारतीयांना पंतप्रधान मोदींचे उत्साहात स्वागत केले. यावेळी वंदे मातरमसह अन्य काही घोषणा देण्यात आल्या. या स्वागत समारंभात आकर्षणाचा विषय ठरली ते एका चिमुकलीने पंतप्रधान मोदींना दिलेली विशेष भेट. या लहान मुलीने पंतप्रधान मोदी यांना तिने रेखाटलेले चित्र भेट म्हणून दिले.
मान्या असे या मुलीचे नाव असून, तिने दिलेले रेखाचित्र पंतप्रधान मोदींनी आपलेपणाने स्वीकारले. तसेच चित्रावर स्वाक्षरी करत, तिला शाबासकी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य लहान मुलांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये सात देशांच्या आठ नेत्यांसोबत द्वीपक्षीय आणि बहूपक्षीय बैठकीत सहभागी होतील. याशिवाय मोदी ५० आंतरराष्ट्रीय उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
यंदाचा पंतप्रधान मोदींचा पहिला परराष्ट्र दौरा
कोरोना संकटाच्या काळात परराष्ट्र दौरे झाले नाहीत. मात्र, जगातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने विविध राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष परदेश दौऱ्यांवर निघाले आहेत. सन २०२२ मधील पंतप्रधान मोदींचा पहिला परराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जर्मनीपासून सुरु झाला आहे. यानंतर ते डेन्मार्कला भेट देतील. कोपेनहेगनमधील एका परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. यानंतर ते फ्रान्सला भेट देतील. फ्रान्समध्ये ते इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्क्होलाच यांच्यात द्वीपक्षीय चर्चा होणार आहे. भारत जर्मनी इंटर गर्वमेंटल कन्सलटेशनच्या सहाव्या फेरीची चर्चा दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होईल. यावेळी दोन्ही देशांचे महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर डेन्मार्कसाठी रवाना होणार आहेत.